सोमवार, २० मार्च, २०१७

स्मारकामुळे समृद्धी येत नाही



शरद जोशींच्या मला आवडलेल्या एका पुस्तकाचे  नाव आहे 'जग बदलणारी पुस्तके'. लोकसत्तेत या पुस्तकाचा परिचय करून देणारा लेख आला होता. मूळात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना जागतिकतेचे भान यावे, या उद्देशाने हे लेख आपल्या नियतकालिकातून जोशी यांनी लिहिले. आणि विशेष म्हणजे, शेतकरी संघटनेच्या प्रशिक्षण वर्गात येणाऱ्या प्रशिक्षणार्थीच्या दृष्टीकोनात आमूलाग्र बदल झाल्याचे जोशी यांना आढळून आले. आणि म्हणूनच स्वातंत्र्य या संकल्पनेबाबत स्वारस्य असलेल्या सर्वानाच उपयुक्त ठरावे या हेतूने या लेखांचा पुस्तकरूपी संग्रह प्रसिद्ध करण्यात आला.
भारतातील शेतीचे दारिद्र्य समजण्यासाठी ही पुस्तके निदान शेतकऱ्यांच्या मुलांनी तरी अभ्यासली पाहिजेत. समाजवादाने आणि भ्रष्ट नौकरशाहीमुळे आपला देश सत्तर वर्षापूर्वी  'उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ट नौकरी' इथून सुरुवात करून आज 'उत्तम नौकरी, मध्यम व्यापार, कनिष्ट शेती' इथपर्यंत कसा आला हे त्यामुळे कोणालाही उमगेल. 'अजि म्यां ब्रह्म पहिले' हा पहिला लेख त्यांनी अमेरीकेतल्या एका छोट्या गावात असलेल्या पुस्तकाच्या दुकानाच्या भेटीवर लिहिला आहे. त्यात ते म्हणतात - "पंधरा हजार वस्तीच्या गावातील पुस्तकांचे एक दुकान आपल्याकडील विश्वविद्यालयाच्या ग्रंथालायापेक्षा मोठे असते, याचा मोठा अचंबा वाटत होता."



जगातील दहा मोठ्या वाचनालयाची माहिती देणारा हा विडीओ बघा.
भारतात असे एकही वाचनालय नाही. अशा वाचनालयांची यांची तीन चार शतकांची परंपरा आहे. आपल्या वाचनालयात पुस्तकांची पाने फाडून घेणे, पुस्तकात रेघा मारणे, लिहिणे, पुस्तके परत न करणे, पुस्तक लोकांना दाखवण्यासाठी घेऊन मिरवणे हे सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. 
आपली उपजीविका ज्या विषयातल्या ज्ञानावर आहे त्या विषयाची किंवा इतर कोणत्याही विषयाची मुळात आवड नसणे, आवडीच्या विषयातली चार चांगले लेखक माहित नसणे, त्यांची पुस्तके वाचलेली नसणे, त्यांनी नेमके काय लिहिले आहे माहित नसणे, आपल्याला आवडलेल्या पुस्तकांचा घरी संग्रह नसणे अशी आपली 'मोले घातले वाचाया' अशी अवस्था आहे. 
घरात, गावात एका छानश्या लायब्ररीचे महत्व आपल्याला वाटत नाही. म्हणूनच मग स्मारक म्हटले की थोरामोठ्यांचे पुतळे उभारणे, उन्च पुतळ्यांची स्पर्धा लागणे या पलीकडे आपली कल्पना जाऊ शकत नाही. अशा स्मारकामुळे समृद्धी  येत नाही. समृद्ध समाजात आपोआप समृद्धीची  स्मारके निर्माण होतात. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा