शुक्रवार, २४ जून, २०१६

समृद्धीची लक्षणे 'आणली' की समृद्धी अपोआप येते हे खरे नाही



चांगले जीवन, घर, चांगली आरोग्यसेवा , शिक्षण व्यवस्था, वाहतूक, पायाभूत व्यवस्था, वीज-पाणी-रस्ते, इंटरनेट, पोलीस, न्याय व्यवस्था ही सगळी समृद्धीची लक्षणे आहेत. त्या असल्या की समृद्धी अपोआप येते हे खरे नाही. उत्तरोत्तर समृद्ध होत जाणाऱ्या व्यवस्थेत या गोष्टी हळूहळू प्रश्न सुटत जातील तस तशा संपन्न होत जातात. राज्यकर्त्यांचा या गोष्टी सरकारी तिजोरीतून अमाप खर्च करून, असतील तिथून आणून समृद्धी आली असा भास निर्माण करण्याचा खटाटोप असतो. तो कधी सिद्धीस जात नाही. त्याचे सोंग होते.

असा विकास / समृद्धी आयात करता येत नाही. त्याचे रोपण सुद्धा होत नाही. ही एक आतील, अंगभूत बदलाची प्रक्रिया असते. अशा सोंगवजा प्रगतीचे सोविएत नमुने आपण भारतभर पाहतो आहोत. आपल्या शाळा, दवाखाने, पोलीस , निवडणुका, लोकशाही, रस्ते, खादी , सूतकताई, सर्वशिक्षा अभियान, साक्षरता, प्रौढ शिक्षा, साधी राहणी, हुंडाबंदी, अहिंसा, समता, सहकार, झाडे लावणे, शिक्षण, परीक्षा, मेरीट, नौकरी, देशभक्ती, सगळे असेच सोंग आणल्यासारखे चालू असते. गेल्या पन्नास साठ वर्षात आपण हे मन लावून प्रामाणिकपणे करण्यात तरबेज झालो आहोत.

ह्या सगळ्या वास्तवाची जाणिव मला ' निशाणी डावा अंगठा' वाचतांना झाली. आपण सगळे या महानाटकातील पात्रे आहोत. मी जगतोय प्राध्यापकाच्या भूमिकेत. प्राध्यापक म्हणावे असे माझे काही नाही. आमचे मित्र डॉक्टर, वकील, कारकून, दुकानदार, व्यापारी, शेतकरी, सुतार, न्यायाधीश, नेता, पोलीस, संशोधक आहेत. म्हणजे आम्ही त्या त्या पात्रांची लक्षणे (फारतर प्रामाणिकपणे) बाळगून आहोत. लॉटरी ची सोडत लागली तसे योगायोगाने आम्हाला ही पात्रे करायला मिळाली. वेगळी पात्रे मिळाली असती तर आम्ही तीही केली असती. रमेश इंगळे उत्रादकर यांनी लिहिलेल्या '‘निशाणी डावा अंगठा’' या कादंबरीवर एक चित्रपटही झाला आहे. पण त्यात कादंबरी वाचतांना जाणवणारे, अस्वस्थ करणारे हे वास्तव सुमार विनोदाच्या नादात हरवून गेले आहे.

मागच्या काळातल्या पाणी अडवा पाणी जिरवा, शिक्षणाचे खाजगीकरण, फळबाग योजना, कुटिरोद्योग, औद्योगिक विकास योजना, साक्षर गाव, तंटामुक्त गाव, हागणदारीमुक्त गाव ही सगळी सोंगे आम्ही वठवली. आता मोदींच्या स्वच्छ भारत, मन की बात, मेक इन इंडिया, महाराष्ट्रातील जालयुक्त शिवार, पांजरापोळ, आणि नवी वनशिवार योजनेचेही आम्ही जंगी नाटक करू. अगदी स्वस्तात विमान प्रवास होईल. बुलेट ट्रेन येईल. २० काय २०० उपग्रह आकाशात पाठवू. पण हे सगळे सेटचा भाग असेल. आमच्यात काही बदल होणार नाहीत. 'होल वावर इज आवर' चालूच आहे. पाऊस हुलकावण्या देतोच आहे. बाकी सगळे ठीक ठाक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा